गणेश आर्ट गॅलरी

राजाचा दरबार याविषयी आपण आत्तापर्यंत ऐकलेच आहे पण गणेश दरबार म्हणजे नक्की काय? ह्या पृथ्वीतलावर तो आहे तरी कुठे? डोंबिवली शहरात “गणेश योगिनी प. पू. सद्गुरू सौ. संध्याताई अमृते” ह्यांच्या साधनेतून साकारलेल्या श्री सिद्धीविनायक मयूरेश्वर मंदिरात हा दरबार पाहायला मिळतो.

गणेश आर्ट गॅलरीची जागा वाचनालयासाठी नियोजित केलेली होती. पण प. पू. सौ. ताईंना साधनेमध्ये दृष्टान्त झाला की या जागेत बाप्पा लहान मुलांच्या रूपात खेळत आहेत आणि मग प्रत्येक बाप्पााने आपल्यासाठी जागा करून घेतली, अश्या प्रकारे गणेश आर्ट गॅलरीचा जन्म झाला.

गणेश आर्ट गॅलरी म्हणजे ६४ कला आणि १४ विद्या अवगत असणाऱ्या गणेशाचे कलादालन. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी गणेशाचे अस्तित्व इथे बघायला मिळते. राजस्थानातील तसेच चाईनातील गणेशमूर्ती लक्ष वेधून घेतात. समुद्रातील शंख-शिंपल्यापासून बनवलेली बाप्पाची विविध रुपे पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपातील गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते. विठ्ठलाच्या रूपातील गणेश देवता, पिंपळपानातील गणेशाचे रूप बघून डोळ्याचे पारणे फिटते. थायलंड मधील गणेशमूर्ती एकाच झाडातून निर्माण केली आहे. दुबईतून आलेल्या बालगणेशावरून नजर हटत नाही. विविध कला सादर करणाऱ्या सुपारितील गणेशमूर्ती बघायला मिळतात. ८०० वर्षे होऊन गेलेल्या पंचधातुतील दुर्मिळ मूर्ती तसेच याकच्या शिंगपासून बनवलेला गणेश आर्ट गॅलरीत संग्रहित आहेत. शमी व मांदार वृक्षातून प्रगटलेल्या गणेशमूर्ती मन भारावून टाकतात. मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांनी भेट दिलेली श्री बल्लाळेश्वराची मूर्ती आर्ट गॅलरीचे सौन्दर्य वाढवते. विविध रत्ने आणि धातू ह्यापासून घडविलेल्या गणेशमूर्ती कलादालनात विराजमान झाल्या आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर प्रत्यक्ष ढगात प. पू. सद्गुरू ताईंना बाप्पाने दर्शन दिले तो क्षण हृदयात जपून ठेवावा असा आहे. गणेश आर्ट गॅलरीमध्ये साधारण अडीच ते तीन हजार गणेशमूर्ती आहेत. अतिशय दुर्मिळ असे हे कलादालन आहे. एकदा बघून समाधान होत नाही परत परत बघावेसे वाटणारे असे हे कलादालन आहे.